विस्मरण हे
ज्येष्ठांसाठी नवं नाही. वयानुसार स्मरणशक्ती कमी होते हे तर सर्वमान्य वाक्य आहे,
पण या वाक्याआड दडलेला धोका लक्षात न आल्यामुळे डिमेन्शिया या विस्मरणाच्या
आजाराचं प्रमाण वाढत आहे. भारतातील ज्येष्ठांची संख्या मोठी आहे त्यातच या
आजाराबद्दल असलेल्या अज्ञानामुळे ही समस्या आणखी गंभीर होत आहे. दरवर्षी 21
सप्टेंबरला जागतिक अल्झायमर दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त डिमेन्शिया व
अल्झायमर याविषयी...
------------------
हैदराबादवरून एक आजी आमच्या
मधुरभाव वृद्धाश्रमात रहायला आल्या. त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत नोकरी करतो
आणि तिथेच त्याच्या कुटुंबासोबत राहतो. तशा आजीही अनेकदा अमेरिकेला जाऊन आल्या; पण तिथं त्यांचं मनच रमलं नाही, कारण केवळ
आठवड्याच्याअखेरीलाच मुलगा, सून भेटायची ते फिरायलाही जायचे. उरलेला आठवडा ते
कामात इतके व्यस्त की त्यांना बोलायलाही वेळ नासयचा. करमणुकीची फारशी साधनं उपलब्ध
नाहीत आणि मराठी माणसंही त्या परिसरात फारशी नव्हती. सध्याच्या अनेक ज्येष्ठांची
होते तशीच त्यांचीही अमेरिकेत राहणं म्हणजे सोनेरी पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षासारखी
अवस्था झाली. त्यांच्या मुलानी मधुरभावची माहिती वाचली आणि त्यांना वृद्धाश्रमात
घेऊन आला. आजी एकदम हुशार होत्या फिजिक्स आणि गणिताच्या प्राध्यापक म्हणून त्यांनी
कॉलेजात नोकरी केली होती. ‘आजी,
मधुरभावमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन ठिकाण जुळवून घ्यायला थोडासा वेळ लागतो,’
असं म्हणत मी त्यांचं स्वागत केलं. मी
हे बोलत असतानाच त्या तेच ते प्रश्न चार वेळेला विचारत होत्या. जेवण कधी येणार?
मी
कुठे आले आहे? माझा मुलगा कधी येणार?
एक-दोन दिवसांत मला लक्षात आलं की ही विस्मरणाच्या आजाराची
(डिमेन्शिया)
किंवा अल्झायमरची सुरुवात आहे.
हा प्रसंग सांगण्याचं कारण म्हणजे या 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय अल्झायमर दिन
आहे. अल्झायमर या हळूहळू माणसाला ग्रासणाऱ्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी हा
दिवस पाळला जातो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजाराचे प्रमाण मोठे आहे. हळूहळू
स्मरणशक्ती कमी होणं, भाषाज्ञान कमी होणं, निर्णय न घेता येणं, नियोजन न करता
येणं, दैनंदिन कामं न करता येणं ही याची प्रमुख लक्षणं आहेत. या सगळ्यामुळे
माणसांचा समाजाशी संर्पक तुटतो आणि अगदी घरातलेही त्यांच्याशी वाईट वागायला
सुरुवात करतात. काही प्रकरणांमध्ये घरच्यांना माहीतच नसतं की आपल्या आई किंवा
वडिलांना डिमेन्शिया झाला आहे. ज्येष्ठ नागरिकही वयामुळे स्मरणशक्ती कमी होते या
सबबीखाली होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच डिमेन्शियाबद्दल जनजागृती
होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
मधुरभावमध्ये आलेल्या त्या आजी नंतर सांगू
लागल्या की, ‘माझा
मोबाईल हरवला.’ मग तर माझी खात्रीच पटली की त्यांना विस्मरण
होत आहे, कारण त्यांच्या मुलाने त्यांच्याकडे मोबाईल दिलाच नव्हता.
वृद्धाश्रमातल्या सगळ्यांना त्या विचारत होत्या माझा मोबाईल दिसला का?
मी डिमेन्शियाच्या रुग्णांना कसे हाताळावे या विषयाचे
प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे मी त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवणे (Divert)
आणि विचलित करणे (Distract)
हे
दोन प्रकार मी सुरू केले. मी त्यांना ‘आपण मोबाईल शोधूया,’
असं आश्वासक उत्तर दिल्यानंतर त्या आजींचा आत्मविश्वास वाढला. त्याऐवजी ‘
तुमच्या मुलानी मोबाईल दिलेलाच नाही. उगीच त्रास देऊ
नका,’ असं जर मी म्हणाले असते तर
त्यांच्या वागण्यात खूपच मोठा फरक पडला असता. आपण त्यांच्या बाजूने आहोत असं
दाखवणं अशा वेळी अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांची चेष्टा करून त्यांना हसलं किंवा
त्यांना विरोध केला तर ते खूपच धोकादायक असतं. त्यांच्या मुलाशी बोलल्यावर माझ्या
लक्षात आलं की त्यांना एक वर्षापासून विस्मरण होतं आहे. त्या बाकी शारीरिकदृष्ट्या
धट्ट्याकट्ट्या होत्या त्यांना रक्तदाब वगैरे आजारही नव्हते. पण त्या एकट्या
राहिल्या आणि विसरल्या तर या भीतीने त्यांच्या मुलाने त्यांना आमच्या वृद्धाश्रमात
सोडले होते.
मी जसं आधी सांगितलं की डिमेन्शियाबद्दल
जनजागृती व्हायला हवी तशीच या आजाराबद्दल प्रशिक्षित व्यक्तींनी तशा रुग्णांची
सेवा करायला हवी ही पण काळाची गरज आहे. मी तसे प्रशिक्षण घेऊन पुण्यात पिंपळे
निलखला मधुरभाव हा वृद्धाश्रम चालवते. यामध्ये डिमेन्शियाच्या रुग्णांसाठी विशेष
व्यवस्था केल्या आहेत. या आजाराने ग्रस्त रुग्ण कसं वागतात, कुठल्या गोष्टींची
मागणी करतात, त्यांच्याशी गोड बोलून कसं वागायचं, त्यांना औषधं देण्यासाठी काय
युक्त्या योजायच्या हे सगळं प्रशिक्षण माझ्या वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांना
देण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत प्रेमाने आजी-आजोबांची काळजी घेतो.
आधुनिक औषधोपचारांमुळे जीवनमान वाढले आहे.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढली आहे. त्यांना सेवा देणाऱ्यांची संख्या
त्या प्रमाणात नाही. त्यात परत वेगवेगळ्या आजारांनुसार सेवा देण्याचे कौशल्य
बदलते. तशी सेवा करणारे कर्मचारी तर खूपच कमी आहेत. भारतातील ज्येष्ठांमध्ये
डिमेन्शियाचे प्रमाण वाढत आहे. काही गैरसमज आणि आजाराबद्दल माहितीचा अभाव यामुळे
तर ती संख्या अचूक सांगणं शक्य नाही कारण आजारी व्यक्ती ओळखलीच जात नाही. पण
साधारणपणे उतारवयात डिमेन्शिया होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे आपल्या घरातील
ज्येष्ठांकडे मुलांनी लक्ष द्यायला हवे. साधारपणे एखादं वाक्य सारखं सारखं बोलणे,
वस्तू, वेळा किंवा इतर गोष्टी विसरणे, व्यक्तींची नावे, नाती विसरणे अशी लक्षणं दिसली तर सजग रहायला हवं. ही लक्षण दिसली म्हणजे
डिमेन्शिया झाला असं समजू नये कारण वृद्धत्वामुळेही ही लक्षणं दिसू शकतात. पण ही
लक्षणं खूप गंभीर वाटायला लागली तर लगेच डॉक्टरांकडून चाचणी करून घ्यायला हवी.
हे झालं
डिमेन्शिया झाल्यावरच्या गोष्टींबाबत. ज्या ज्येष्ठांना डिमेन्शिया झालेला नाही
त्यांनी कोडी सोडवणे, पाठांतर करणे, स्मरणशक्तीचे खेळ खेळणे, मेमरी क्लबमध्ये
सहभागी होणे असे प्रयत्न करावेत. जेणेकरून त्यांचा मेंदू तल्लख राहील.
ही काळजी घेतली तर डिमेन्शिया आपल्यापासून दूर
राहील आणि आपण सगळेच आनंदात राहू.
Comments
Post a Comment