Fight with Corona Virus with MadhurBhav Seniors



इंटरनेट, वाय-फाय, टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया, फेसबूक, ट्विटर, शेअर बाजार, कॉर्पोरेट, काश्मीर या सगळ्याच परवलीच्या शब्दांचा एव्हाना सगळ्यांना विसर पडलाय. सकाळी उठताना आणि रात्री झोपतानाही केवळ एकच शब्द सर्वांच्याच तोंडावर आहे तो म्हणजे कोरोना. संपूर्ण आयुष्यावर कोरोनाची काळी दाट छाया पसरली आहे. हे महासंकट कधी टळेल कुणास ठावूक?’, ‘लॉकडाऊन जूनच्या शेवटापर्यंत चालेलच,’ ‘जगाचं कसं व्हायचं?’ असे प्रश्न आणि चर्चाच सध्या सुरू आहेत.
ही जरी कोरोनाची एक बाजू असली तरीही दुसरीकडे मात्र प्रयत्न, प्रयत्न आणि कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील डॉक्टर, आरोग्य यंत्रणा, आरोग्य रक्षक, हॉस्पिटलमधील नर्स, कर्मचारी, पोलीस, सैन्य दलं, निमलष्करी दलं, जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कोरोनावर संशोधन करणारे संशोधक या सगळ्यांनीच कोरोना विषाणूसमोर तेवढंच मोठं आव्हान उभं केलंय. माणसांचे बळी घेण्यासाठी आलेल्या या कोरोनाराक्षसाविरुद्ध हे सगळेच कंबर करून आत्मसमर्पण भावनेनी लढत आहेत. हा लढा नक्कीच यशस्वी होईल असा दुर्दम्य आत्मविश्वासच या सगळ्यांना लढण्यासाठीचं इंधन पुरवतो आहे. यामध्ये मधुरभाव वृद्धाश्रमही आपल्या संपूर्ण ताकदीनिशी ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी उभा राहिला आहे.  
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मार्चला जनता कर्फ्युबद्दलचं निवेदन करतानाच वैद्यकीय माहितीच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना या कोरोना विषाणू संसर्गाचा खूप मोठा धोका असल्याचं स्पष्ट केलं होतं. पिंपळे-गुरवमध्ये असलेल्या माझ्या मधुरभाव या वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठांच्या रक्षणाची खूप मोठी जबाबदारी आता माझ्या खांद्यांवर असल्याची जाणीव मला तेव्हाच झाली. सरकारनी स्पष्ट केलं होतं की 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये. मधुरभावमध्ये तर 79 ते 90 वयापर्यंतचे  50 ज्येष्ठ राहतात आणि या सर्वांनाच त्यांच्या वयामुळे कोरोना होण्याची शक्यता सर्वाधिक होती.  
संकटकाळात खचून न जाता योग्य उपाययोजना करण्याचं मधुरभावमधल्या सर्वांनी ठरवलं. वृद्धाश्रम सुरू करण्याआधी अनेक वर्षें मी फार्मसी उद्योगात काम केलेलं असल्यामुळे वैद्यकीय विषयाचा माझाही अभ्यास होता. त्यामुळेच निर्णय घेणं, त्यानुसार नियोजन करणं आणि त्याची योग्य अंमलबजावणी करणं या सगळ्याची मला सवय होती. त्याला माझ्या वृद्धाश्रमातील मामा-मावशींपासून व्हिजिटर डॉक्टर आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आमच्या आजी-आजोबांनी खंबीर साथ दिली.
निवासी स्टाफची नियुक्ती आणि बाहेरच्यांना बंदी
 पहिली गोष्ट म्हणजे बाहेरून कुणालाही वृद्धाश्रमात यायला बंदी केली. ज्येष्ठांच्या नातेवाईकांना त्यांची काळजी वाटली तर ते येतील ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांचे पालक व्यवस्थित असल्याचे त्यांना कळवले आणि त्यांनाही यायला परवानगी दिली नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वृद्धाश्रमातच राहून काम करणारा स्टाफ कामावर ठेवला त्यामुळे त्यांना बाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्याचबरोबर सर्व कर्मचारी स्वत: चं डिटॉक्सिफिकेशन करूनच काम करत होते. या तीन उपायांमुळे विषाणू संसर्गाची साखळी तुटली.  डॉक्टर आणि नर्सिंग करणाऱ्या व्यक्ती फक्त बाहेरून येत होत्या त्याही सर्व काळजी घेऊनच वृद्धाश्रमात प्रवेश करायच्या. आणि हेच सर्व आताही चालू आहे.
मानसिकता सांभाळणे
ज्येष्ठांची मानसिकता सांभाळणं ही एरवीही तशी महत्त्वाची बाब असते पण आता त्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. टीव्हीवरून दाखवल्या जाणाऱ्या बातम्या पाहून त्यांच्या मनात भीती उत्पन्न होऊ नये याची काळजी घेतली. त्यामुळे त्यांना टीव्हीऐवजी इतर गोष्टींत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मी गेली 10 वर्षे ज्येष्ठ नागरिकांसोबत काम करते. ज्येष्ठ मनाने खूप खंबीर असतात आणि ते परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार असतात असा माझा अनुभव आहे. देशपांडे मॅडम आणि आमचा स्टाफ यांनी सर्वांची मानसिकता सकारात्मक ठेवण्याची खूप मोलाची जबाबदारी पार पाडली. या सर्व प्रयत्नांमुळे हे संकट आपल्या वृद्धाश्रमात येणार नाही आणि आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू असा विश्वास आमच्या सर्व आजी-आजोबांच्या मनात आहे.
घरगुती उपायांचा फायदा
बहुतांश आजी-आजोबांचा घरगुती औषधं-काढा यांवर प्रचंड विश्वास आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानेही असे काही उपाय सुचवले होते. त्यामुळे वाफ घेणे, गरम पाणी पिणे, मीठ-साखरेच्या गुळण्या करणे, रात्री झोपताना सर्वांना हळद-दूध देणे, ज्यांच्या प्रकृतीला सोसतो त्यांना चवनप्राश देणे अशा गोष्टी नियमितपणे चालू ठेवल्या. या उपयांवर विश्वास असल्यामुळे आपल्याला काही होणार नाही हा आत्मविश्वास ज्येष्ठांत निर्माण झाला आणि ते निरोगीही राहिले असा दुहेरी फायदा झाला.
वैद्यकीय तपासण्या, सोशल डिस्टन्सिंग
मधुरभावमध्ये ज्येष्ठांच्या वैद्यकीय तपासण्या नियमितपणे केल्या जातातच. पण कोरोनाबद्दल वेगवेगळ्या बातम्या मिळत असल्याने दररोज सर्वांची सर्दी, ताप, खोकला या तपासण्या केल्या. वृद्धाश्रमात सोशल डिस्टन्सिंगचं व्यवस्थित पालनं केलं. नेहमीप्रमाणे सकाळी व्यायाम करून घेतला. व्हिटॅमिन सीच्या गोळ्या त्यांना दिल्या. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नातेवाईकांशी संपर्क साधून दिला. त्यामुळे आपले पालक सुरक्षित असल्याची भावना पाल्यांमध्ये निर्माण झाली आणि ज्येष्ठांना आधार वाटला.
परिसरातील ज्येष्ठांना मदतीचा हात
केवळ वृद्धाश्रमातीलच नाही तर समाजातील ज्येष्ठांचे कल्याण व्हावे हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी आमच्या परीने जे करणे शक्य होते ते आम्ही करत असतो. पिंपळे-सौदागर परिसरात राहणाऱ्या अनेक ज्येष्ठांच्या घरात काम करणाऱ्या मावशी लॉकडाउनमुळे येणं बंद झालं. आजारी वृद्धांचे केअरटेकरही  उपलब्ध नव्हते. अशावेळी सामाजिक जबाबादारीचं भान राखत मधुरभावमध्ये येऊन राहण्याची सोय आम्ही उपलब्ध करून दिली. ज्या ज्येष्ठांना जेवण आणि राहण्याचीच सोय उपलब्ध नाही त्यांनी मधुरभावमध्ये रहायला येण्याचे आवाहन केले. कोरोना विषाणू संसर्गाचं संकट संपेपर्यंत संपूर्ण पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांना आसरा (शेल्टर) उपलब्ध करून देण्याचं काम मधुरभावच्या वतीने केलं जात आहे. ही सेवा मर्यादित काळापुरतीच आहे. तरी ज्यांना अशी सेवा हवी असेल त्यांनी (८८०५५०१६००)  या क्रमांकावर संपर्क करावा. 
संकट कितीही महाकाय असलं तरीही माणसाने संघटितपणे त्याचा सामना करायचा ठरवला तर त्या संकटालाच गुडघे टेकावे लागतात. देशाने लॉकडाउनचे पालन करून हेच सिद्ध करून दाखवलं आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मधुरभावने आपली जबाबदारी पार पाडली आहे आणि पुढेही पार पाडत राहील. आमच्या या पाठिंब्यामुळे आजपर्यंत मधुरभावकडे डोळे वर करून बघायची कोरोना विषाणूची हिंमत झालेली नाही. त्याला माहीत आहे की, इथल्या ज्येष्ठांनी आपल्याशी दोन हात केले आहेत आणि त्यांना मधुरभावची खंबीर साथ आहे.

Comments

Popular posts from this blog

Life Journey till now and battle continues.....

Today’s Truth: Why mend when you can replace?

All Seniors are Safe during COVID-19